वाशिम प्रतिनिधी- दिलीप अवगण पाटील
वाशीम : ( दि. 2 एप्रिल ) देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदीवाशीम येथिल पत्रकार गजानन धामणे यांची निवड करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडियाचे साप्ताहिक विंग चे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी नुकतेच नियुक्तीपत्र देऊन धामणे यांची निवड केली आहे.
गजानन धामणे हे बहुजन शिवनीती या साप्ताहिकाचे मुख्य संपादक - मालक आहेत. ते गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी देशोन्नती या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम केले आहे. तसेच लोकमत, सकाळ, लोकशाही वार्ता, एकमत, जनमाध्यम, विदर्भ मतदार, महासागर आदी वृत्तपत्रातुन पत्रकारिता केली आहे. तसेच सिटी न्युज सुपरफास्ट या वृत्तपत्रात सध्या कार्यरत असून विविध लेखमाला चालवीत आहेत.
तसेच मुक्त पत्रकार म्हणूनही ते ओळखले जातात.
व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे सरचिटणीस चंद्रमोहन पूप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के आदींनी साप्ताहिक विंग ची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी विनोद बोरे यांना दिली आहे. त्यानुसार राज्य कार्यकारिणी आणि महाराष्ट्रभरातील जिल्हाध्यक्षांची नियुक्ती विनोद बोरे हे करत आहेत. याकामी राज्यभरात साप्ताहिक विंग चे संघटन वाढविण्यासाठी गजानन धामणे यांचे मोलाचे योगदान मिळणार असल्याचे बोरे यांनी नियुक्तीप्रसंगी म्हटले आहे. या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आहेत. साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकिय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्विकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक- पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, म्हाडाच्या घरकूल योजनेच्या आरक्षणामध्ये अधिस्विकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळणे, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमधून साप्ताहिकाच्या संपादकांना निधी मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनांची माहिती मिळावी आदी प्रश्न सोडविण्याचे काम तातडीने हाती घेणार असल्याची प्रतिक्रिया गजानन धामणे यांनी दिली आहे. धामणे यांच्या निवडीचे वाशीम जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील साप्ताहिकांच्या संपादकांनी कौतुक केले आहे.
