नायब तहसीलदार संपावर
ठाणे प्रतिनिधी ( सचिन घावट ):- महसूल विभागातील नायब तहसीलदार हे महत्त्वाचे कार्यकारी पद असून हे पद राजपत्रित वर्ग दोनचे पद आहे. असे असतानाही या पदाला राजपत्रित वर्ग २ असूनही वर्ग-३ च्या पदाची वेतनश्रेणी असल्याने ती सुधारित करून प्रशासनातील इतर समकक्ष पदाचे समान करावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवार (३ एप्रिलपासून) नायब तहसीलदारांनी बेमुदत संप पुकारला आहे.
यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४० नायब तहसीलदारांचा समावेश आहे. नायब तहसीलदारांनी पुकारलेल्या संपामुळे तहसीलदार कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांनी शासनाकडे ग्रेड पे वाढीसंबंधात पाठपुरावा करण्यात आला; परंतु त्याला यश आले नाही. तसेच बक्षी समितीने दिलेल्या अहवालातही नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे वाढवून देण्यात आला नाही.
नायब तहसीलदार हे पद लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने व पदोन्नतीने भरले जाते; परंतु इतर राजपत्रित गट- ब संवर्गाचा ग्रेड पे मात्र नायब तहसीलदार या पदापेक्षा जास्त आहे.
नायब तहसीलदार हे महसूल खात्यातील महत्त्वाचे पद असून त्यांच्याकडे अर्धन्यायिक कामकाज, दंडाधिकारी, खनिकर्म, नैसर्गिक आपत्ती मदत व पुनर्वसन, निवडणूक, पर्यवेक्षकीय कामे इत्यादी महत्त्वाची कामे असतात.
तरीदेखील या पदाच्या ग्रेड पे मध्ये वाढीसंदर्भात शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नायब तहसीलदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
या संपात ठाणे जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संपावर गेले आहेत.त्यानुसार सकाळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
