रिसोड प्रतिनिधी -अन्सार शेख
रिसोड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीने भाजपाला झटके देण्याचे काम केले आहे. सदर झटके देण्याचे काम हे सभापती उपसभापती निवडणुकीच्या प्रक्रियेपर्यंत पाहावयास मिळाले. जिल्हा वासियांचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आज 25 मे रोजी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अतिशय रोमांचक व मोठी उलथापालथ पहायला मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला नशीब लाभले. ईश्वर चिठ्ठी ने झालेल्या या निवडणुकीत दोन्ही पदे महाविकासाच्या पदरात पडली. आज स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्याआधी भाजपचे अनंतराव देशमुख गटाचे संजय शिंदे शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीत दाखल झाले. महाविकास नेत्यांनी त्यांना सभापती पदाची ऑफर दिली, ती त्यांनी स्वीकारली. सदर निवडणूक प्रक्रिया हात वर करून पार पडली, 9/9 सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दर्शवल्यानंतर अखेर ही निवडणूक ईश्वर चिठ्ठी ने केली, यामध्ये सभापती पदासाठी भाजपचे शामराव उगले यांचा महाविकास चे संजय शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतर उपसभापतिपदाच्या निवडणुकीत महाविकास चे राजाराम आरू यांनी सेनेच्या शिंदे गटाचे गजानन आवताडे यांचा पराभव केला. विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी स्थानिक आमदार अमित झनक यांच्या जनसंपर्क कार्यालयात वर फटाके फोडून आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार साहबराव नप्ते यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.सहाय्यक बनसोडे यांच्यासह मोरे यांनी सहकार्य केले.
संजय शिंदे यांना आपल्या गटात आणण्यात आमदार अमित झनक यांच्याशिवाय विष्णुपंत भुतेकर, डॉ.चंद्रशेखर देशमुख, विश्वनाथ सानप, धनंजय बोरकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.या टीमने मिळून भाजपला मोठा धक्का दिला आहे.बाजार समिती निवडणुकीत अनंतराव देशमुख यांच्या गटाला टक्कर देण्याचे काम महाविकासने प्रथमच केले. यामुळेच 18 पैकी 8 सदस्य निवडून आणण्यात यशस्वी ठरले, त्यानंतर त्यांनी आपल्या कौशल्याने सभापती व उपसभापती पदे बळकावून सर्वांनाच चकित केले.
सुरज बालाजी कांबळे हा 14 वर्षाच्या मुलगा महाविकाससाठी नशिबाचा धनी ठरला.निवडणूक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सूरजला खांद्यावर बसवून आनंद साजरा केला.
लोकन्याय संघर्षचे भाकीत खरे ठरले
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या संदर्भात यापूर्वी लोकन्याय संघर्षने एक भाकीत केले होते. उगले की पाचरणे किंवा तिसरा कोण या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते तर ते खरे ठरले असल्याचे दिसून येते.या निवडणुकीत भाजपाकडून शामराव उगले यांचे नाव निश्चित झाले होते तर गजानन पाचरणे यांना माघार घेण्याचे काम पडले होते. या निवडणुकीत उगले यांचा पराभव झाला तर सभापतीपद तिसऱ्यालाच गेले. पाचव्यांदा सभापती पदावर विराजमान होण्याचे शामराव उगले यांचे स्वप्न भंगले.1997 ला प्रथम उगले यांनी सभापती पद मिळवले होते त्यावेळी त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ घालवला होता. मात्र यावेळी भाजपकडून निवडून आल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही.
