अफसर शेख
आज शनी अमावास्या असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शनिभक्त शनी शिंगणापूरपूध्ये दाखल झाले आहेत. मात्र पंढरपूरचा पालखी सोहळा सुरु असल्याने यंदा भाविकांची संख्या कमी असल्याचे देवस्थान ट्रस्टने सांगितले आहे.
भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन दर्शन रांगेमध्ये मंडपची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
शनी अमावस्येच्या दिवशी दर्शन घेतल्यास आपल्यावर येणारी संकट दूर होतात, अशी धारणा शनी भक्तांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी दाखल होत असतात. शनी अमावस्या असल्याने अनेकांनी शनीला तेलाचा अभिषेक घातला आहे.
