'शाखाधिकाऱ्याची मनमानी , ग्रामिण भागातील वृध्द शेतकरी , महिलांना प्रचंड त्रास"
मालेगाव /
मालेगाव येथील स्टेट बँकेचे शटर दुपारी ४ वाजताचे आतच बंद केले जात असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे . ग्रामिण भागातुन तातडीच्या कामासाठी आलेल्या तसेच वयोवृध्द बँकेच्या ग्राहकांना सुध्दा शटर बंद असल्यामुळे परत जावे लागत आहे . काही ग्राहकांना मात्र एका बोळीतुन उंच जिन्याच्या पायऱ्यावरून ४ वाजल्यानंतरही आत घेतले जाते . मग असा भेदभाव का ? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत .
मालेगांव येथील स्टेट बँकेच्या कारभाराविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या खुप तक्रारी असुन मनमानी कारभार सुरू आहे . शेतकऱ्यांना शासनाकडुन मिळत असलेले अनुदान जसे अतिवृष्टी , पुरग्रस्त निधी , तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान आदी शेतकऱ्यांच्या खात्यात महानो महीने जमा केले जात नाही . त्यासाठी त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात . शेतकरी , विद्यार्थी , भुमीहीन , तसेच गोरगरीब नागरिकांची तसेच वृध्द- अपंग यांना नवीन खाते उघडण्यासाठी बँकेकडुन खुप मनस्ताप सहन करावा लागतो . कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे बोलतात .निरक्षरांना सहकार्य करण्यासाठी बँकेत कुठलीही व्यवस्था नाही . अशा संबंधीतांच्या तक्रारी आहेत .
एखादा कर्मचारी लाँग लिव्ह वर असेल तर त्याच्या जागी पर्यायी व्यवस्था केली जात नाही . त्या टेबलवर असलले काम दुसरा कोणी करत नाही . त्यामुळे ग्राहकांना अनेक चकरा माराव्या लागतात .
बँकेत ग्राहकांची गर्दी होऊन त्रास होऊ नये यासाठी बँकेच्या वेळेत कधीही शटर बंद केले जाते . या बँकेचे ए टी एम बहुतांश वेळा दुरुस्तीच्या नावाखाली बंदच असते . त्याची लवकर दुरुस्ती केली जात नसल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो . तसेच बँकेची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असताना बँक ४ वाजताच बंद केली जाते . एखादया ग्राहकाला कितीही महत्वाचे काम असले तरी ते ऊघडले जात नाही . मात्र काही विशिष्ट ग्राहकांसाठी ४ नंतरही एका बोळीतुन उंच जिना चढुन वर घेतले जाते . त्यामधे महत्वाचे व अर्जंट काम असलेल्या पेन्शनधारक वयोवृद्ध ग्राहकांनी , आजारी , बी पी चा त्रास असलेल्या वयस्कर ग्राहकांनी तसेच महिलांनी वर इतक्या पायऱ्या चढून वर कसे जावे ? याचा प्रश्न ग्राहकांना पडतो. आत मात्र बँकेची वेळेपर्यंत काम सुरू असते. म्हणजे आतून सुरू बाहेरून बंद .अशा प्रकारची बँकेची अवस्था असल्यामुळे या बँकेवर ग्राहकांची प्रचंड नाराजी असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात बँकेच्या शाखाधिकार्याशी चर्चा केली असता त्यांनी सायंकाळी चार वाजता शटर बंद करण्याचे आदेश वरिष्ठाकडूनच प्राप्त झाल्याचे सांगितले . 'मी मॅनेजर आहे मी कोणाला आत सोडायचे व कोणाला नाही सोडायचे हे मी बघीन ' .अशा प्रकारची उद्धट उत्तरे सुद्धा सदर बॅंकेचे मॅनेजर ग्राहकांना देतात . असा अनेकांचा अनुभव आहे .
रिझर्व बँकेचे सर्व बँकांसाठी नियम वेगवेगळे आहेत का ? इतर बँका सायंकाळी साडेपाच -सहा वाजेपर्यंत सुरू राहात असताना स्टेट बँकेलाच वेगळे अधिकार कसे ? असे प्रश्न ग्राहक विचारत आहेत .
.jpg)