जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस




दौंड:- आलिम सय्यद


पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये विनापरवाना यंत्र सामुग्री प्रस्थापित करून रासायनिक उत्पादन चालू केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांनी मंगळवार (ता.१८) रोजी जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीला नोटीस बजावली आहे. 

     कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या बेकायदेशीर रासायनिक उत्पादन करत आहेत. शासन नियमानुसार संबंधित कंपनीने उत्पादन, कच्चा माल, साठवून क्षमता, घातक कचरा व सांडपाणी विल्हेवाट याबाबतची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. पण कंपन्यांकडून या नियमाला बगल देण्यात येत आहे. परवाना क्षमतेपेक्षा जास्त साठवून करून बेकायदेशीर उत्पादन केले जात आहे. तसेच परवाना एका उत्पादनाचा तर प्रत्यक्षात वेगळे उत्पादन केले जात असल्याचे दिसून येत आहे. घातक कचरा व सांडपाण्याचे परिस्थितीनुसार नियमबाह्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे असे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपन्यांवर केल्या जाणार कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

    पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी कुरकुंभ येथील जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीला १३ डिसेंबर २०२२ मध्ये भेट दिली होती. यावेळी शासकीय परवानगीबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करत कंपनीतील यंत्र सामग्रीची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीने पूर्व संमती न घेता प्लांट आणि यंत्र सामग्री स्थापित करून उत्पादनासाठी युनिट चालू केले होते. कंपनीतील उत्पादित घातक कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन शून्य द्रव डिस्चार्ज केले नसल्याचे दिसून आले होते. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीवर कायदेशीर कारवाईबाबतचा प्रस्ताव २३ डिसेंबर २०२२ रोजी वरिष्ठ कार्यालयात सादर केला होता. 

     दरम्यान, पुणे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी जेसन्स लॅबोरेटरीज कंपनीचा उत्पादन प्रक्रिया त्वरित बंद करण्याचे निर्देश का दिले जाऊ नये ? तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश का दिले जाऊ नये ? अशी लेखी विचारणा केली असून याबाबतचा योग्य खुलासा सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post