वर्ग 10 आणि 12 चे विद्यार्थी: बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना
विद्यार्थी जीवनात परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यातही बोर्ड परीक्षा म्हणजे 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी अनुभवणारी एक मोठी परीक्षा. ही परीक्षा भविष्यातील शिक्षण आणि करिअरसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांवर, पालकांवर आणि शिक्षकांवरही या परीक्षेचे दडपण असते.
विद्यार्थ्यांना परीक्षेचा तणाव जाणवतो, काहींना भीती वाटते, तर काहींना असे वाटते की यश मिळवण्यासाठी अमर्याद अभ्यास करावा लागेल. पण योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि मानसिक संतुलन ठेवले, तर बोर्ड परीक्षा ही एक सोपी आणि आनंददायी प्रक्रिया होऊ शकते.
परीक्षेची तयारी करताना एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे - "परीक्षा तुमच्या सध्याच्या तयारीची चाचणी घेतात, तुमची नाही. शांत राहा!"
परीक्षेचे दडपण आणि अपयशाची भीती
या तीव्र स्पर्धात्मक युगात, सर्व बाजूंनी सातत्याने होणाऱ्या दबावामुळे परीक्षांना जीवन-मरणाचा प्रश्न मानण्याची प्रवृत्ती निर्माण होते. पण परीक्षा म्हणजे जीवन-मरणाचा प्रश्न नाही आणि अपयश म्हणजे शेवट नव्हे. मृत्यूच्याच भीतीसारखी अपयशाची भीती बाळगू नका.
कोण विसरेल माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना? तुम्हाला त्यांच्याबद्दल एक रंजक गोष्ट माहीत आहे का? ते मूळतः लढाऊ वैमानिक बनू इच्छित होते, पण ते थोडक्यात अपयशी ठरले. मात्र, ते निराशेत अडकून राहिले नाहीत. त्यांनी नवीन संधी स्वीकारल्या आणि अखेर ते महान शास्त्रज्ञ झाले. जर त्यांनी हे अपयश स्वीकारले नसते, तर भारतीय अणुकार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान झाले नसते.
जीवनाच्या संदर्भात परीक्षा पाहा
ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? एक परीक्षा किंवा चाचणी एखाद्या व्यक्तीची ओळख ठरवू शकत नाही. जीवन त्याहून खूप मोठे आहे. अपयश आले तरी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग सोडू नका. जीवन म्हणजे नवीन संधी शोधणे, शिकणे आणि यशाच्या नव्या कहाण्या घडवणे.
परीक्षांना जीवनाच्या मोठ्या संदर्भात पाहा, त्यांना अत्यधिक महत्त्व देऊ नका. अशा दृष्टिकोनाने अभ्यास करणे अधिक आनंददायी आणि तणावरहित होईल.
बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी?
१. वेळेचे योग्य नियोजन करा
परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे.
संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा घ्या आणि कोणते विषय, कोणते प्रकरणे महत्त्वाचे आहेत हे ठरवा.
दररोज किती तास कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, याचे वेळापत्रक तयार करा.
अवघड विषय अधिक वेळ घेतील, त्यांना जास्त वेळ द्या.
नियमित उजळणीसाठी स्वतंत्र वेळ ठेवा.
२. नियमित अभ्यास आणि पुनरावृत्ती करा
"Last minute study" किंवा शेवटच्या क्षणी अभ्यास टाळा. परीक्षेच्या आदल्या रात्री नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.
वर्षभर नियमित अभ्यास केला असेल, तर परीक्षा सोपी होते.
दिवसातील ठराविक वेळ अभ्यासासाठी राखीव ठेवा आणि तो वेळ पाळण्याचा प्रयत्न करा.
किमान दोनदा पूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करा.
३. सराव परीक्षा आणि प्रश्नपत्रिका सोडवा
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यास परीक्षेच्या स्वरूपाची चांगली कल्पना येते.
सराव परीक्षेद्वारे वेळेचे नियोजन सुधारता येते.
उत्तरपत्रिकेचे स्वरूप, उत्तरांची लांबी, महत्त्वाचे मुद्दे यावर भर द्या.
स्व-मूल्यांकन करून चुका ओळखा आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
४. आत्मविश्वास वाढवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
"मी परीक्षेत चांगले करू शकतो" हा आत्मविश्वास ठेवा.
चुकीचे विचार टाळा, जसे की "मी काही करू शकत नाही", "ही परीक्षा खूप अवघड आहे" इत्यादी.
सकारात्मक विचारसरणी ठेवा – तुम्ही मेहनत केली आहे, त्यामुळे यश नक्की मिळेल.
५. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या
परीक्षेच्या काळात आहार संतुलित असावा.
सकस अन्न, फळे, दूध आणि भरपूर पाणी प्यावे.
रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून झोप कमी होऊ देऊ नका.
झोपेची कमतरता असल्यास लक्ष केंद्रित करता येत नाही.
व्यायाम, ध्यान आणि योग यांचा समावेश करा.
६. परीक्षेच्या वेळी काय करावे?
परीक्षेच्या दिवशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. पण शांत राहिल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.
पेपर हातात घेतल्यावर सर्वप्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचा.
वेळेचे नियोजन करून सोपे प्रश्न आधी सोडवा, नंतर कठीण प्रश्न घ्या.
उत्तर लिहिताना स्पष्टपणे, मुद्देसूद आणि व्यवस्थित लिखाण ठेवा.
चुकीच्या उत्तरांवर वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे वळा.
शेवटच्या काही मिनिटांत उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासा.
पालकांची भूमिका आणि त्यांचे योगदान
विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांची भूमिका देखील महत्त्वाची असते. पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे आणि त्यांच्यावर अनावश्यक दडपण आणू नये.
मुलांच्या अभ्यासक्रमात जास्त हस्तक्षेप न करता त्यांना मार्गदर्शन करावे.
मुलांनी आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करावा, याची काळजी घ्यावी.
त्यांना मानसिक आधार द्यावा आणि अभ्यासाव्यतिरिक्तही थोडा वेळ विश्रांतीसाठी उपलब्ध करून द्यावा.
पालकांनी देखील परीक्षा ही जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण त्याच्यावर संपूर्ण यश अवलंबून नाही, हे समजून घ्यावे.
परीक्षेनंतर काय करावे?
परीक्षेनंतर निकालाची चिंता न करता नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या.
पुढील शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी वेगवेगळे पर्याय शोधा.
जर निकाल अपेक्षेप्रमाणे नसेल, तरी खचून जाऊ नका, पुढे अनेक संधी असतात.
बोर्ड परीक्षा ही जीवनातील अंतिम कसोटी नाही. ती फक्त शिक्षणाचा एक टप्पा आहे. योग्य नियोजन, सराव आणि सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास ही परीक्षा तणावरहित आणि यशस्वी होऊ शकते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.
सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा. राजेश अंबाडकर
श्री रेणुकामाता कनिष्ठ महाविद्यालय, गोवर्धन, ता. रिसोड, जिल्हा वाशिम
