अनसिंग ग्रामपंचायतीला सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा – रस्ते, नाले, कचरा व्यवस्थापन आणि लाईट समस्यांवर त्वरित उपायाची मागणी
प्रतिनिधी/अनसिंग (ता.वाशिम):
अनसिंग गावातील वाढत्या नागरी समस्यांमुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिक सातव व यश सतीश चव्हाण यांच्या हस्ते निवेदन सरपंच व सचिवांना देण्यात आले असून, त्यात रस्त्यांवरील खड्डे, साचलेले पाणी, नाल्यांची सफाई, कचरा व्यवस्थापन व सार्वजनिक लाईट्सच्या समस्यांवर त्वरित लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या पावसाळ्याच्या काळात गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचून राहते, जे आरोग्यास घातक ठरत आहे. डास व कीटकांची संख्या वाढल्याने साथीचे आजार पसरू शकतात.
गावातील नाले अनेक ठिकाणी तुंबल्यामुळे पाणी मुरत नाही आणि दुर्गंधी पसरण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय, गावात कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. सार्वजनिक लाईट्स बंद असल्यामुळे अंधारात नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
या सर्व समस्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांना उपोषण किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनकर्त्यांचे मत आहे.

