पालघर जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक
पालघर प्रतिनिधी -सतेंद्र मातेरा.
पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, तसेच पर्यटन व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पालघरचे खासदार आमदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी उपस्थित राहून पर्यटन व्यवसायिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकल्या आणि त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
पालघर जिल्ह्याला तब्बल 120 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, या किनाऱ्यावर पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून पर्यटन व्यवसायिक संघटनांकडून विकासकामे आणि परवान्यांशी संबंधित अडचणीबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. याच पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
पर्यटन व्यवसायिकांकडून बैठकीत अनेक महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये –
2015 पासून कालबाह्य झालेल्या परवाना प्रक्रियेबाबत – लॉजिंग लायसन्स, स्विमिंग पूल लायसन्स आणि खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची मागणी.
पर्यटन आस्थापनांच्या वास्तू नियमित करणे.
एक खिडकी योजना अमलात आणून पर्यटन व्यवसायासाठी लागणारी जमीन अकृषक करणे.
पर्यटन स्थळांवर वीज पुरवठा सुरळीत करणे आणि व्यवसायिकांना औद्योगिक दराने वीज बिल आकारणे.
महामार्गावर पर्यटन स्थळांचे दिशादर्शक फलक उभारणे व पर्यटनाची प्रसारमाध्यमांतून जाहिरात करणे.
पर्यटन संचालनालयाचे कार्यालय पालघर येथे आणणे.
मोठ्या प्रकल्पांच्या सीएसआर फंडातून पर्यटन स्थळांचे आधुनिकीकरण करणे व सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणे.
किनाऱ्यावरील सीआरझेड नियम शिथिल करणे.
लघु स्तरावर वाईन निर्मितीला परवानगी देणे.
पर्यटन फेस्टिव्हलसाठी शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करणे.
किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारे, केळवे तलावाचे सुशोभीकरण, पाणकोट किल्ल्याची डागडुगी यासाठी निधी उपलब्ध करून देणे.
केळव्याचे शितलादेवी मंदिर तीर्थक्षेत्राचा दर्जा, तसेच केळवे रोड रेल्वे स्थानक पर्यटन स्थानक म्हणून घोषित करणे.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बरागडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, पालघर जिल्हा पर्यटन संघाचे जगदीश ठाकूर, केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे संजय घरत, आशिष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पर्यटन संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पर्यटन व्यवसायिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आगामी काळात शासन, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक व्यवसायिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
पालघर जिल्हा प्रतिनिधी: सतेंद्र मातेरा
