शेतकऱ्यांचे जगणेच संकटात – तातडीने मदत द्या : राम इढोळे
वाशीम (प्रतिनिधी):
“आज शेतकरी म्हणून जगणेच कठीण झाले आहे,” अशी जिव्हारी लागणारी वेदना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम इढोळे यांनी व्यक्त केली. अतिवृष्टीच्या कहरामुळे शेतजमिनींचे अपरिमित नुकसान झाले असून, हजारो शेतकरी उघड्यावर पडले आहेत.
इढोळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, सरकारने तातडीने पंचनामे करून १०० टक्के नुकसानभरपाई जाहीर करावी. या भागाला ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, ही काळाची गरज आहे.ते पुढे म्हणाले,
“शेतकऱ्यांच्या संकटाकडे जर सरकारने दुर्लक्ष केले, तर शेतकरी शांत बसणार नाहीत. जनआंदोलन उभारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहावे.”
👉 शेतकरी नेत्यांच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आता शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

