नाकर्त्या शासनाने घेतला आणखी एका मराठा बांधवाचा बळी?
जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी लोहा तालुक्यातील तरुणाचे टोकाचे पाऊल; पंचक्रोशीत शोककळा
नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असतानाच नांदेड जिल्ह्यातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. लोहा तालुक्यातील मौजे वडगाव येथील मराठा बांधव दामोदर रामचंद्र काळे (वय 35) यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे ते अत्यंत अस्वस्थ होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काल दिवसभर मराठा आंदोलनाकडे होत असलेल्या कथित दुर्लक्षाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “सरकार आपल्याला काहीच देणार नाही. रोज जरांगे पाटील मरत आहेत, पण सरकारला काहीच पडलेले नाही. मराठ्यांच्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, तरीही सरकार केवळ राजकारण करत आहे,” अशा आशयाची व्यथा त्यांनी व्यक्त केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
रात्रभर याच चिंतेत आणि मानसिक अस्वस्थतेत राहिल्यानंतर आज पहाटे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने वडगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून, एका 35 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने मराठा समाजात संताप आणि दुःखाची तीव्र भावना निर्माण झाली आहे.
एका घराचा आधार हरपला, कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि मराठा समाजाने आणखी एक बांधव गमावला, अशी वेदनादायी प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर गावकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार बंडू जाधव यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काही गावकऱ्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकीय चर्चेचा विषय न राहता आता अनेक कुटुंबांच्या वेदना, भविष्य आणि अस्तित्वाशी जोडला गेला आहे. शासनाने या घटनेकडे केवळ आणखी एक आकडा म्हणून न पाहता मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

