राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे निवेदनातून मागणी.
संग्रामपूर/ जिल्ह्यातील नाफेड ची बंद पडलेली खरेदी केंद्रे तात्काळ हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सरकारने पूर्वरत खरेदी सुरू करावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सहकार व पणन अपर मुख्य सचिव यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी झालेल्या पावसामुळे यावर्षी रब्बी हंगामामधे चांगल्या प्रमाणात हरभऱ्याचे उत्पादन झालेले आहे. केंद्र शासनाने २०२२-२३ मध्ये निश्चित केलेल्या दरानुसार बुलढाणा जिल्ह्यात अगोदरच अत्यंत उशिराने हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यातल्या त्यात आज पर्यंत संपूर्ण राज्याकरिता हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले जात असतांना या वर्षी जिल्हास्तरावर हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करून एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणुक करण्याची शासनाने भूमिका घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्या करिता निश्चित केलेले तोकडे ६ लाख ६१ हजार क्विंटलचे उद्दिष्ट खरेदी सुरू होऊन १५ ते २० दिवसातच पूर्ण होऊन ९ एप्रिल पासून खरेदी बंद झालेली आहे. एकूण नोंदणी केलेल्या ९४ हजार ४०५ शेतकऱ्यांपैकी ३४ हजार २५४ शेतकऱ्यांच्याच हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. व बुलढाणा जिल्ह्यात अद्याप ६० हजार १५१ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी आहे व त्याकरिता जवळपास १३ ते १४ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट अपेक्षित आहे. तरी शेतकऱ्यांच्या हरभऱ्यास बाजारात हमीभाव मिळत नाही व अत्यंत अल्प दराने त्याला बाजारामध्ये हरभरा विकून नुकसान सहन करावे लागत आहे. व त्यामुळे हमीभाव योजना असतांना सुद्धा शेतकऱ्यांची लुबाडणूक करून त्याला नागविण्याची भूमिका शासनाची दिसून येत आहे. तरी तात्काळ हरभरा खरेदीचे उद्दिष्टे वाढवून आधारभूत खरेदी दरानुसार नाफेडची खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शासनाकडून तात्काळ उद्दिष्ट वाढवून खरेदी केंद्र सुरू न झाल्यास जिल्हाभरात तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सहकार व पणन अपर मुख्य सचिव यांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.
