ठाण्यातील जुने सिव्हिल रुग्णालय इतिहासजमा सिव्हीलच्या दगडी इमारतीचे पाडकाम सुरु९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार
ठाणे प्रतिनिधी ( नितिन बोराडे ) ठाण्यातील जुने विठठल सायन्ना अर्थात सिव्हील रुग्णालय इतिहासजमा झाले. बुधवारी सिव्हिल रुग्णालयाच्या दगडी इमारतींचे पाडकामास सुरुवात झाली. या सिव्हील रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तुर्तास येथील सर्व वैद्यकिय विभाग सिव्हील रुग्णालयासमोरील परिचर्या केंद्रात हलवले असुन काही सुविधा प्रादेशिक मनोरुग्णालयातील जागेत केली जाणार आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील हजारो रुग्णासाठी जीवनदायी ठरणाऱ्या सिव्हील रुग्णालयाच्या इमारती जुन्या झाल्यामुळे याठिकाणी नवे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे दोन वर्षांपूर्वी या रुग्णालयाच्या इमारतीच्या पाडकामाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालय उभारणीचा निर्णय मागे पडला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रुग्णालयाच्या उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या आवारातील दोन इमारती पाडण्यात आल्या तर बुधवारी येथील ८७ वर्ष जुनी दगडी इमारत पाडण्यात आली.
विठठल सायन्नांच्या स्मृती
१९३६ साली नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती. तेव्हापासुन तब्बल साडेआठ दशके हे रुग्णालय गोरगरीबांसाठी कार्यरत होते.इमारत पाडकाम सुरु होताच येथील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण करून जुन्या आठवणी जतन केल्या.
