वाशिम जिल्ह्यात अल्पवयीन मुलामुलींचे विवाह धुमधडाक्यात

 वाशिम जिल्ह्यात अल्पवयीन मुलामुलींचे विवाह धुमधडाक्यात !

वा शिम - कमी वयात मुलीचे लग्न झाल्यास पुढील काळात मोठी शारीरीक व आरोग्याची गुंतागुंत निर्माण होवू शकते. पर्यायाने कमी वयाचा परिणाम जन्माला येणार्‍या बाळावरही होवू शकते हे लक्षात घेवून शासनाने मुलीच्या लग्नाचे वय १८ वर्ष निर्धारीत केले आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाकडून सातत्याने जनजागृती होत असून अल्पवयीनांचे बालविवाह रोखण्यासाठी या विभागाने १०९८ ही चाईल्ड लाईनही सुरु केली आहे.

मात्र नागरीकांत खासकरुन ग्रामीण भागात अद्यापही याविषयी जनजागृती झाली नसून सद्याच्या लग्नाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यात कित्येक अल्पवयीन मुलींचे विवाह धुमधडाक्यात उरकल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. बाल विवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने हा कायदा कठोर केला आहे. मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने या कायद्याला सुरुंग लावण्याचे काम शहरी तसेच ग्रामीण भागात सुरु आहे. असे बालविवाह रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पारंपारीक विवाह पध्दतीसह या विवाहाची एक महिना अगोदर विवाह नोंदणी करणे ग्रामपंचायत तसेच नगर पालीका स्तरावर सक्तीची करणे गरजेचे असून यासोबतच मोठ्या प्रमाणावर मातापित्याचे समुपदेशन करणेही तितकेच गरजेचे आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post