विमुक्त जाती संवर्गातील चौदा जातीचे आरक्षण पुन्हा धोक्यात




           करा किंवा मरा तांडा सुधार समितीची हाक




       वाशीम:- तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या बंजारा वंजारी वादानंतर वंजारी समाजाला २% आरक्षण शासनाला द्यावे लागले या घटनेनंतर परत एकदा विमुक्त जाती प्रवर्गातील बंजारासह इतर १४ जातीचे आरक्षण धोक्यात आले असून याविरोधात वेळीच " करा किंवा मरा" अशी भूमिका घेऊन शासनाच्या भूमिकेविरुद्ध बंजारा समाजाला आवाज बुलंद करण्यासाठी सज्ज राहण्याची आर्त हाक अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी दिली आहे. संभाजीनगर औरंगाबाद येथे १४ मे ०२३ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी भामटा शब्द वगळण्यासोबतच राजपूत समाजाला वसंतराव नाईक भटके विमुक्त विकास महामंडळाच्या कक्षेत आणण्यात येईल अशी घोषणा केली आहे. उपरोक्त महामंडळ हे फक्त भटके विमुक्तसाठी असताना संवर्ण असलेल्या राजपूत समाजाला या महामंडळाच्या कक्षेत आणण्याचा डाव म्हणजे राजपूत समाजाला विमुक्त जातीचा दर्जा देण्याचा डाव शासन करीत आहे. हा डाव हाणून पाडण्यात जर आज बंजारा समाज कमी पडला तर नेहमीसाठी त्यांचे आरक्षण नाहीसे होण्यासारखे आहे. त्यामुळे आरक्षणाचा बचाव करण्यासाठी घराघरातून सगळ्यांनीच बाहेर पडण्याची गरज आहे अशी विनंती नामा बंजारा यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बंजारा समाजाच्या संवैधानिक हक्क आणि अधिकारावर गदा आणत विजा अ मधील 'भामटा' शब्द वगळण्याचा जो निर्णय घेतला आहे यामुळे विमुक्त जाती अ प्रवर्गातील सर्वात मोठा समाज असलेला बंजारा समाजासह इतर १४ जातीवर फार मोठा अन्याय होणार आहे. यामुळे मूळ राजपूत भामटा सोडता इतर सर्व उच्चवर्णीय राजपूत समाजाचा (सुमारे एक ते दिड कोटी) असंवैधानिक, अवैधरीत्या प्रवेश होणार आहे. भविष्यात या आरक्षणाचे मूळ हकदार असलेला बंजारा समाज व तत्सम १४ जाती यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणे कठीण होणार आहे. या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत बंजारा समाजाचे कोणतेही संवैधानिक प्रश्न न सोडवता आमच्याच्या हातात आहे तेही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी महाराष्ट्रातील "सकल बंजारा समाजाने" येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंत्रालय मुंबई यावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सकल बंजारा समाजाच्या वतीने राजपालसिंह राठोड यांनी दिली आहे.

     बंजारा समाजासह १४ इतर जातीच्या  संवैधानिक हक्क अधिकारावर गदा आणणाऱ्या सत्ताधार्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ असल्यामुळे. महाराष्ट्राच्या प्रत्येक गाव--वाडी-वस्ती तांड्यातून लवकरच मुंबईला होणाऱ्या आंदोलनामध्ये स्वखर्चाने सर्वांनी मुंबईला येऊन शक्तीप्रदर्शन करण्याचे आवाहन अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या केंद्रीय कार्यकारिणीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post