प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : भरधाव वेगात आलेल्या कारने ऑटोला उडवल्याने ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. ही घटना आज 7 जून रोजी दुपारी 4 च्या सुमारास रिसोड हिंगोली रस्त्यावरील वाढोना फाटा जवळ घडली. शेख अहेमद नूर शेख मेहबूब वय 48 वर्ष असे मृताचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील अमरदास नगर येथे राहणारे शेख अहेमद नूर हे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून लग्नसमारंभ आटोपून ऑटोने परतत होते. वाढोना फाटा जवळ समोरून भरधाव येणाऱ्या कार टीम एस 08 इ आर
2022 ने त्यांच्या ऑटोला धडक दिली. या धडकेत ऑटो रस्त्याच्या कडेला उलटला, शेख अहेमद नूर व ऑटोमधील अन्य 3 जण जखमी झाले.जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, शेख अहेमद नूर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वाशिमला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत पोलीस या प्रकरणी कारवाई करत होते.


