*अहमदनगर अफसर शेख
नगर : दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात.मात्र यंदा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्या दरम्यान या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. रोहित पवार यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे, तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी पोलीस वारकऱ्यांवर लाठीचार्ज करत असतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं.नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिलं जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय.
आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपाने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? असा प्रश्न देखील त्यांनी ट्विटमध्ये विचारला आहे.
