अफसर शेख
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन कार्यशाळा
अहमदनगर::: शाळा भरताना आणि सुटताना छेडछाड,
पाठलाग करून त्रास देणाऱ्यांची माहिती मुलींनी न घाबरता कळवली पाहिजे. मुलींनी तसेच शिक्षकांनी पोलिस ठाण्यात या रोडरोमिओंची तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले.
शहरातील रूपीबाई बोरा हायस्कूल येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शाळा भरताना आणि सुटताना मुलींची छेडछाड, शेरेबाजी आणि पाठलाग करण्याचे प्रकार होऊ नये, यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोडरोमिओंना कुणीही जाब विचारत नसल्याने काहीवेळा त्यांची हिंमत वाढताना दिसते. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेत परिसरातील शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. रूपीबाई बोरा हायस्कूल या शाळेतील मुलींना पोलीस निरीक्षक यादव यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. शाळेत येता-जातांना, क्लासेसच्या ठिकाणी, प्रवास करताना कुणीही छेड काढल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, मुलींना तक्रार करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावली जावी, मुलींना त्रास होत असल्यास त्यांना तक्रार करण्यास सांगावे, शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बसवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शाळा प्रशासनाला केले. या बैठकीला रूपीबाई बोरा स्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, अशोक फिरोदिया, हायस्कूलचे मुख्याध्यापक भाबड सर, शाळेतील शिक्षक, शिक्षिका कोतवाली पोलीस ठाण्यातील गोपनीय अमलदार योगेश खामकर देवेंद्र पंधरकर यांच्यासह ३०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
शाळेच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची माहिती द्या
शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण मोटरसायकवरून फिरणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले आहे. मुलींना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल. काहीही तक्रार असेल, अडचण असेल तर पोलिस स्टेशन च्या ०२४१ २४१६११७ किंवा ११२ या मदत क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच आपण ७७७७९२४६०३ या पोलीस निरीक्षक यादव यांच्या क्रमांकावर मेसेज करून सुद्धा तक्रार करू शकता.
तक्रार द्या...नाव गोपनीय ठेवले जाईल!
छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कोतवाली पोलिसांकडून शाळेच्या बाहेर तसेच शहरात रोड रोमिओनवर कारवाई सुरूच राहील तसेच मुलींचा आत्मविश्वास वाढवा यासाठी वेळोवेळी शाळा कॉलेज येथे भेटी आणि कार्यक्रम घेणार आहोत. एखाद्या मुलीची कोणी छेड काढल्यास बदनामी होईल, या भीतीमुळे ती मुलगी पोलिसांकडे तक्रार करत नाही. मात्र, असे न करता टवाळखोरांची माहिती पोलिसांना द्या, तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.

