श्री संत शेख महंमद महाराज विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ




अफसर शेख



श्रीगोंदा: तालुक्यातील हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्री संत शेख महंमद महाराजांचा पालखी सोहळा प्रथमच विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात दोन हजार वारकरी सामील झाले आहेत. यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. श्रीगोंदकरांकडून पालखी प्रदक्षिणा मार्गावर सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.             

संत विश्वात संत तुकाराम महाराज व संत शेख महंमद महाराज यांचा वैचारिक व अध्यात्मिक गोडवा होता. या आषाढी वारीत संत तुकाराम महाराज व संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांची पिराची कुरवली येथे पहिली गळाभेट होणार आहे. या गळाभेटीसाठी वैष्णव आतुर झाले आहेत. पालखी सोहळा निघण्यापूर्वी माऊली या अश्वाचे पूजन व पालखी रथ पंढरीकडे नेणारे संदीप बोदगे यांच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले.

 पालखी प्रदक्षिणा मार्गावर महादजी शिंदे व कन्या विद्यालयातील मुलींच्या ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले होते. बाबुमियाॅ संगीत बॅण्ड आणि अनिल ननवरे यांच्या बासरीने वारकऱ्यांचा उत्साह वाढविला.

पालखी सोहळ्यास निरोप देण्यासाठी संत शेख महंमद महाराज यांचे सर्व वंशज, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, बी आर एस चे नेते घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती खेडेकर, तहसीलदार मिलींद कुलथे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post