अफसर शेख
बेकायदेशीर धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दाेन युवकांवर तलवारीने वार करण्याची घटना घडली आहे. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ओंकार पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे. शुभम पडोळे हा जखमी झाला आहे. याबाबत ताेफखाना पाेलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे नगर शहर पुन्हा हादरले आहे.
सोमवारी (ता. १९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शनसमोर ही घटना घडली. याप्रकरणी ओंकार रमेश घोलप (रा. माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश केरुप्पा हुच्चे, नंदू बोराटे व संदीप गुडा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
*पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग*
याबाबत माहिती अशी की, साेमवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. मयत ओंकार भागानगरे याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे आहे. या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून ओंकार भागानगरे याचा तलवारीने वार करून हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
