अहमदनगर अफसर शेख
जिल्हा परिषदेंतर्गत यावर्षी सुरू असलेल्या तसेच निविदा प्रक्रियेत अडकलेल्या कामांना गती देऊन तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार सुजय विखे यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना दिल्या.
बुधवारी खासदार विखे यांनी त्यांच्या दक्षिण मतदारसंघातील कामांचा आढावा जिल्हा परिषदेत येऊन घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह बांधकाम व इतर विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. बांधकाम विभागांतर्गत येणारे रस्ते, रस्त्यांची दुरुस्ती, शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या, बंधारे या कामांचे नियोजन करून त्याची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळते, परंतु पुढे निविदा प्रक्रियेत ते अडकून पडतात. त्यामुळे प्रशासनाने प्राधान्याने ही कामे करावीत. याशिवाय जी कामे सुरू आहेत, तीही पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना द्याव्यात, असे विखे यांनी सांगितले.
गेल्या सव्वा वर्षांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज प्रशासकामार्फत सुरू आहे. या काळात जिल्हा परिषदेने पदाधिकारी नसतानाही प्रशासनाने योग्य नियोजन करून आलेला निधी ९० टक्केच्या पुढे खर्च केला आहे. त्यामुळे यावर्षीही असेच नियोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेतील कामांचा आढावा घेत आहेत. मागील पंधरा दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सीईओंची भेट घेऊन त्यांच्या मतदारसंघातील जलजीवनच्या व इतर कामांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता खासदार सुजय विखे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत येऊन कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
