शेख अन्सार
*रिसोड शहराचा व्याप झपाट्याने मोठा होत चाललेला आहे. नवीन वस्त्या नवीन घरे कॉलनी यामुळे विद्युतचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. याव्यतिरिक्त विद्युत वर चालणारे छोटे-मोठे उद्योगही दैनंदिन वाढत चाललेले आहे. रिसोड शहराला एक स्वतंत्र पावर हाउस ची व्यवस्था केली जावी अशी मागणी केली जात आहे.*
रिसोड : रिसोड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याला रिसोडकर खूपच वैतागलेले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन कामात खोळंबा निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. रिसोड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत वर चालणारे अनेक व्यवसाय आहेत या व्यवसाय धारकांना मात्र या खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याचा खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. डेअरी धारकांचे फ्रिज मधील दूध खराब होत आहे तर त्यातील थंड पेय पदार्थ याचे पाणी होऊन नुकसान होत आहे. दैनंदिन हे नुकसान होत असल्याने जनतेकडून महावितरण प्रति रोष वाढतच चाललेला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व तसेच पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे. मागील दोन-तीन दिवसापासून येथील ३३ केवी उपकेंद्रावर बॅटरी व चार्जर यामध्ये बिघाड होत असल्याने तब्बल आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित होत होता. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. 33 केव्ही महावितरण कडून नवीन चार्जर व बॅटरी बसवण्यात आले. यामुळे आठ ते दहा तास खंडित होणारा विद्युत पुरवठ्यातून सुटका मिळाली असे महावितरण कडून सांगितले जात आहे. मात्र तरीही रिसोड शहरात तार तुटणे डीपी जळणे आदी अडचणी मात्र कायमच आहे.यामुळे रिसोड शहरा करिता एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
प्रतिक्रिया
रिसोड शहर व ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा संबंधित ज्या काही समस्या आहेत या विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष घालून याचा पाठपुरावा करून समस्या कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न करणार.
अमीत झनक
आमदार, रिसोड
गेल्या एक महिन्यापासून रिसोड शहर व तालुक्यात महाविरण कंपनी ची लाईन जात आहे. १३२ के. व्ही व रिसोड शहर ३३ के.व्ही. सब स्टेशन मध्ये वारंमवार बिघाड होऊन शहरातील व तालुक्यांतील नागरिकांना विद्यूत लाईन पासून वंचित राहावे लागत आहे. विज वितरण कंपनी चे कर्मचारी त्यांच्या परिने प्रयत्न करुन विद्यूत लाईन सुरळीत करतात कधी त्यांच्या प्रयत्नांना दोन - चार तासात यश प्राप्त होते तर कधी कधी पंधरा ते अठरा तास लागत आहेत. विजवितरण कंपनी च्या रिसोड शहर व तालुका उपविभागीय कार्यालयातील अनेक कर्मचारी व काही अधिका-याची पदे रिक्त आहेत. तसेच विद्युत सुरळीत राहण्यासाठी लागणारी यंत्रे फारच जुनाट झाली आहेत. या सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील विविध संघटनानी एकत्र येऊन या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या वर तोंडगा काढण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
गजानन बानोरे
सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार रिसोड
माझा दूध डेअरी व तसेच थंड पेय चा व्यवसाय आहे. गेली काही दिवसापासून सातत्याने खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे माझे अतोनात नुकसान झालेले आहे. सदर नुकसान ची भरपाई महावितरण करून देईल का? कारण महावितरण ग्राहकाकडून विद्युत बिलासोबत मीटर भाडे व इतर अनेक चार्जेस लावत असतात. मात्र महावितरण विद्युत पुरवठा सरळपणे देत नाही. वीजबील मात्र तारखेच्या आत आमच्याकडून वसूल केला जातो.
ईश्वरदास तोष्णीवाल
व्यापारी रिसोड
