कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरू गोदड महाराजाचा रथयात्रा उत्सव उद्यापासून.....




कर्जत प्रतिनिधी:- दिलीप अनारसे , दि १३जुलै

            कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरू गोदड महाराजाचा रथयात्रा उत्सव कामिका एकादशीला म्हणजेच उद्या गुरुवारी  आणि शुक्रवारी रोजी होत असून शहरात भाविकांच्या स्वागताची तयारी संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीकडून जोरदार सुरू आहे. संत श्री गोदड महाराज मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून रथोत्सव निम्मिताने ईदगाह मैदान व दादा पाटील महाविद्यालयाजवळ मनोरंजन नगरीची उभारणी करण्यात आली आहे. संत श्री गोदड महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे कर्जतला धाकटी पंढरी असे संबोधित केले जाते. या रथयात्रेला राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची उपस्थिती असते.

        कर्जतसह परिसराचे ग्रामदैवत असणाऱ्या संत श्री गोदड महाराजांच्या रथयात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारचे फुलांनी सजवलेला तीन मजली लाकडी रथ दोरखंडाने भाविक भक्ती-भावाने ओढतात. रथाच्या पुढे तालुक्यातून आलेले भजनी मंडळ हातात पताका घेऊन टाळ मृदंगाच्या तालात भजने गात असतात. रथ यात्रा मार्गावर भाविक नारळाची तोरणे अर्पण केली जातात.यासह ठिकठिकाणी भाविकांना चहा,फराळाची मोफत व्यवस्था केली जाते. तसेच लहानांसह मोठ्यांचाही उत्सुकतेचा विषय असणारी येथील मनोरंजन नगरी लहान-मोठे पाळणे,रेल्वेगाडी,मौत का कुआ,जादूचे प्रयोग,लाईट डान्स यासारख्या खेळण्यां उभारणीचे काम वेगात चालू आहे. तसेच महिलांसह इतर दैनदिन उपयोगाच्या वस्तूंच्या विक्री सह खाद्यपदार्थाचे खास दुकाने थाटली जात असून यातून लाखोची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी १४जुलै रोजी कुस्तीचा हगामा रंगणार असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल हजेरी लावणार असल्याची माहिती संत श्री गोदड महाराज यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे. रथयात्रेवर यंदाही दुष्काळाचे सावट

       मागील वर्षी सह यंदा ही अद्याप पावसाने हुलकावणी दिल्याने कर्जत तालुक्यात पावसाच्या कमी प्रमाणामुळे यंदाच्या रथोत्सवावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. कर्जत तालुका आणि परिसरात अजून मान्सून पावसाने दमदार हजेरी न लावल्याने जुन पाठोपाठ जुलै महिनाही कोरडाठाक गेल्याने सर्वसामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post