पिरामल फाऊंडेशन व श्री सरनाईक समाजकार्य महाविद्यालय यांचा उपक्रम
वाशिम प्रतिनिधी/ प्रदिप पट्टेबहादुर
स्थानिक, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व पिरामल फाऊंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा विकासाच्या मागदर्शक तत्वांचा भाग म्हणून पिरामल फाउंडेशन वाशिम जिल्ह्यामध्ये शिक्षण व आरोग्य विषयक समस्यांवर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत 'युवा सेवा सदन' हा उपक्रम चालविल्या जात असून त्यामध्ये समाजकार्य विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याची संधी दिली जाणार आहे. सेवेच्या भावनेला मध्यवर्ती ठेवून चाललेले युवा सेवा सदन महाविद्यालयीन तरुणांसाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. भारतातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करणे आणि देशाच्या उन्नतीसाठी नेतृत्व करणे हा युवा सेवा सदन उपक्रमाचा उद्देश आहे. समाजात योगदान देण्याच्या कल्पनेने प्रेरित झालेल्या तरुणांसाठी देशाची नि:स्वार्थ सेवा करण्याची मूल्यवान संधी आहे. युवा सेवा सदन तरुणांमध्ये राष्ट्रसेवेची नि:स्वार्थी मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हयातील शिक्षण व आरोग्य विषयक समस्यांची माहिती मिळवून या समस्या सोडविण्याचे कार्य विध्यार्थी स्वयंसेवक करणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजकार्याचे शिक्षणातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थी ग्रहण करतील सोबतच उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका देखील बजावतील.
कार्यक्रमामध्ये पिरामल फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक पौषिता दत्ता यांनी उपस्थितांना युवा सेवा सदन कार्यक्रमाचे स्वरूप व उद्देश या विषयी सविस्तर माहिती दिली व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल अवगत केले.
अश्या उपक्रमांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास आणि सामाजिक समस्या सोडविण्यातील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे महत्व त्यांनी विशेद केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. किशोर वाहाणे, विद्यार्थी विकास समिती प्रमुख प्रा. पंढरी गोरे, प्रा. डॉ. प्रसेनजीत चिखलीकर, सदस्य विद्यार्थी विकास समिती आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील 50 च्या वर स्वयंसेवक विद्यार्थी वाशिम जिल्हयातील विविध गावांमध्ये कार्य करतील. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
