रांजणगाव एमआयडीसीत कामगारांवर अमानुष मारहाण: दोन आरोपी अटकेत
शिरूर प्रतिनिधी अर्जुन शेळके
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये ४० ते ५० कामगारांना कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली आणि डांबून ठेवले. ही घटना २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत घडली.
फिर्यादी सुधाकर रामराव माखणे, वय ३९ वर्ष, जे मूळ वसमत आसेगाव रोड, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील राहणारे आहेत, त्यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ते आणि इतर कामगार ढोकसांगवी गावचे हद्दीत एस के एच कंपनी समोरील अभंग यांचे रूममध्ये राहत होते. कॉन्ट्रॅक्टर आनंद दिगंबर वाघळकर, सुनील दिगंबर वाघळकर, जेवण देणारे प्रशांत श्रावण साळवे आणि सुपरवायझर अक्षय काळे यांनी कामगारांना डांबून ठेवून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले.
कामगारांना केलेल्या कामाचे पैसे न देता त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसे मागितले असता कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझर यांनी फायबरचे पाईपने पाठीत व कमरेवर मारहाण केली. या मारहाणीत कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आनंद वाघळकर व प्रशांत साळवे यांना अटक केली आहे आणि त्यांना ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी माहिती दिली की पोलीस हवालदार संदीप जगदाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे आणि PSI अविनाश थोरात हे प्रकरण तपासत आहेत
