जवान चंद्रकांत काळे अनंतात विलीन

 



 पोलीस दल व सैन्यदला कडून मानवंदना, विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली


वडूज ता . खटाव  येथील जवान चंद्रकांत महादेव काळे यांना शुक्रवारी संध्याकाळी आठच्या सुमारास  साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला. 'अमर रहे, अमर रहे, चंद्रकांत काळे अमर रहे', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सातारा पोलिस दलाने व सैन्य दलाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर विराट जनसागराच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. वडूजच्या लाडक्या सुपुत्राला अखेरची मानवंदना दिल्यानंतर अवघा परिसर शोकसागरात बुडाला.

                राजस्थान येथील महाजन फायरिंग रेंजमध्ये युद्ध सराव करत असताना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ट्रेनिंग कॅम्प साठी निघालेल्या चंद्रकांत काळे यांचा अपघाती मृत्यू झाला ही बातमी गुरुवारी सकाळी समजताच वडूज शहरात शोकाकुल वातावरण होते. जवान चंद्रकांत काळे यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी  तीनच्या सुमारास दाखल होताच कुटुंबीयांसह अवघे  शहर शोकाकुल झाले. शुक्रवारी  दुपारी तीनच्या सुमारास वडूज येथे त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आल्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन कुटूंबीय, नातेवाईक व मित्र परिवार यांनी घेतले. घरा समोर त्यांचे पार्थिव आणल्यानंतर आई किसाबाई काळे, वडील महादेव काळे, भाऊ, पत्नी मनिषा काळे, मुलगा श्रेयश, मुलगी श्रुती आणि नातेवाईक मित्रपरिवार यांच्या अश्रूंचा बांध फुटला अन उपस्थितांची मने हेलावून गेली. तदनंतर त्यांचे पार्थिव फुलांनी सजावट केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत ठेवून शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरात दुतर्फा उभे राहून लोकांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव  केला. अमर रहे अमर रहे, वीर जवान चंद्रकांत काळे  अमर रहे, अशा घोषणा देत हजारो वडूजकरांनी चंद्रकांत काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वडूज शहरातील अवघा पथ रांगोळी आणि फुलांनी सुशोभित केला होता. संपूर्ण परिसर साश्रू नयनांनी गलबलून गेला. 

                   यावेळी  ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. दिलीप येळगावकर, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख,  स्वातंत्र्य सेनानी उत्तर अधिकारी विश्वासराव काळे, माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे सर, माजी सभापती अशोकराव गोडसे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे,  माजी सभापती संदीप मांडवे, नगराध्यक्षा मनिषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार,  प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, मुख्याधिकारी कपिल जगताप, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथील एस. डी. हांगे, सुभेदार रामचंद्र जाधव, कैलास जाधव, निवृत्त हवा. राजेंद्र जगदाळे,  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी हुतात्मा परशुराम विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी रेथलींग परेड केली मुलगा श्रेयश काळे यांने पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी वीर जवान चंद्रकांत काळे अमर रहे, वंदे मातरम्,भारत माता की जय घोषणेने परिसर दणाणून निघाला.


Post a Comment

Previous Post Next Post