पुण्यातील रांजणगाव खंडाळे परिसरामध्ये एक महिला व दोन लहान मुलांचे मृतदेह आढळले; रांजणगाव परिसरात खळबळ
पुणे प्रतिनिधी अर्जुन शेळके
पुणे (२५ मे) : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रोवेल कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना पुणे-अहिल्यानगर हायवे नजीक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आली असून, मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. महिला आणि दोन्ही बालकांच्या शरीरावर कोणतेही गंभीर जखमेचे निशाण स्पष्टपणे दिसून येत नसल्याने ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळाजवळील परिसर सील करण्यात आला असून, पोलिसांकडून विविध कोनांतून तपास सुरू आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा गांभीर्याने तपास करत असून, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.
ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे का? की यामागे कोणाचा कट आहे? याबाबतची माहिती तपासानंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणी अधिकृत माहिती मिळताच पुढील अद्ययावत तपशील दिला जाईल.
