शेतकऱ्यांना युरिया खत तातडीने उपलब्ध करून द्या – राम इढोळे यांची मागणी
वाशीम (प्रतिनिधी):
तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते राम इढोळे यांनी केली आहे. सध्या शेतकरी विविध संकटात सापडले असून, पिकांना योग्य हमीभाव मिळत नाही, आर्थिक अडचणी वाढत आहेत आणि नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचे पिक सध्या वाढीच्या टप्प्यावर असून, युरिया खताची अत्यंत गरज आहे. मात्र, वाशीम तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे आणि उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि वाशीम तालुक्यात युरिया खत पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. राम इढोळे यांनी केली आहे.
