शिरूर, ता. २३ जुलै –
शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडक कारवाईत ५,५०,०००/- रूपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अरबाज हबीब शेख (वय १९, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) या इसमाला अटक करण्यात आली असून, त्यास २५ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरात गस्त घालणाऱ्या पथकाला पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर बायपासवरील रिलायन्स जिओ पंपाजवळ लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून गुटखा विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्वरित सापळा रचला आणि संशयित वाहन ताब्यात घेतले.
वाहन क्रमांक MH 16 DG 5597 ची झडती घेतली असता, त्यात गोवा बनावटीचा १,००० पानमसाला व तंबाखूचा सुमारे ५२,५००/- रूपयांचा गुटखा आढळून आला. यासोबतच ५ लाख रूपये किमतीची स्विफ्ट कार देखील जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप व पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पो.उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.
.
