प्रतिनिधी- शंकर तिडके
| शिरूर, पुणे | २६ जुलै २०२५
जय जवान माजी सैनिक संस्था, निमगाव माळुंगे यांच्या वतीने आज कारगिल विजय दिवस अत्यंत सन्मानपूर्वक आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातून भव्य देशभक्तीपर गीत लावून मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत गावातील सर्व आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला-पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन जय जवान माजी सैनिक संस्था, निमगाव माळुंगे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मा. सुभेदार रामचंद्र विधाटे, उपाध्यक्ष मेजर शिवले, सचिव सुभेदार मेजर चंद्रकांत आबा चव्हाण होते. तर कार्यक्रमाचे संघटक मेजर संजय चव्हाण पाटील यांनी नियोजन व समन्वय यशस्वीरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता शहीद जवानांना मानवंदना अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिकांनी ड्रेस व मेडलसह हजेरी लावून आपल्या देशभक्तीची जाणीव सर्वांना करून दिली.मिरवणुकीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष विधाटे साहेब म्हणाले की, "देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी देशसेवा आहे."
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जय जवान माजी सैनिक संस्थेचे सदस्य, ग्रामपंचायत व गावकरी मंडळींचे सहकार्य लाभले.



