पिंपरी दुमालातील श्री सोमेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
शिरूर | प्रतिनिधी : अर्जुन शेळके
श्रावण सोमवारच्या शुभमुहूर्तावर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री सोमेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी भक्तिभावाने हजेरी लावली. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. पारंपरिक वेशभूषा, ओव्या, हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण होते त्यावेळी
भाविकांनी श्री सोमेश्वराचे दर्शन घेत असताना अभिषेक, जलाभिषेक, विविध पूजाविधी आणि महाआरतीमध्ये सहभागी होत आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली. मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अभिषेकासाठी विशेष रचना करण्यात आली होती. तसेच महिलांसाठी वेगळी रांग, जेष्ठ नागरिकांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था, आणि पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवामध्ये गावातील युवकांनी स्वयंसेवक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. वाहतूक व्यवस्था, भाविकांना मार्गदर्शन, आणि शिस्तबद्ध रांगांची आखणी यामुळे कोणताही गोंधळ न होता दर्शन सुरळीत पार पडले. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येत आदर्श व्यवस्थापनाचे दर्शन घडवले.
श्रद्धेचा उत्कट आविष्कार
श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, श्री सोमेश्वर मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे केंद्रबिंदू मानले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली. अनेकांनी उपवास धरून, पायी वारी करत दर्शनासाठी मंदिर गाठले. या भक्तांच्या ओघात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
धर्म, संस्कृती आणि एकतेचा संगम
हा धार्मिक उत्सव केवळ भक्तिभावाचा नव्हे, तर गावातील एकात्मतेचा, सांस्कृतिक जाणीवेचा आणि परंपरेचा साज आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे.
