शिरूर पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून ७० झाडांचे वृक्षारोपण
शिरूर (प्रतिनिधी शंकर तिडके) –
हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत शिरूर पोलिस स्टेशन (पुणे ग्रामीण) यांच्या वतीने दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिरूर जवळील नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारत परिसरात हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात श्रीविवेक फाउंडेशन तर्फे पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने ७० झाडांची देणगी देण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन श्री. स्वप्नील भालेराव (उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.कार्यक्रमास नगरसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचतगट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या वेळी महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी "एक झाड माझे, माझ्या कर्तव्याचे" या संकल्पनेखाली झाडे लावली. प्रत्येक सहभागी व्यक्तीने एक झाड स्वतःच्या नावाने लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
पोलिस प्रशासनाच्या या सकारात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पर्यावरण पूरक कार्याची गरज अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे.


