वाशिम: राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रिसोड मध्ये निर्धार सभा आहे मात्र तत्पूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे फडणवीसांना शेकऱ्यांची नेमकी भीती का वाटते असा सवाल उपस्थित होत आहे.
रिसोड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. मात्र तत्पूर्वी दामुअण्णा इंगोले यांनी फडणवीसांना पत्र लिहून सोयाबीनला आठ हजार रुपये दरवाढ मिळावी, पिकविम्याचे पैसे ३१मे ऐवजी ३० एप्रिल पर्यंत द्यावेत व अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केली होती व फडणवीस यांनी २०१३ साली सोयाबीन दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनाचा व्हिडीओ समाज माध्यमावर टाकला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फडणवीसांच्या सभेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करेल या भीतीने दामुअण्णा इंगोले व त्यांच्या कार्यकर्त्यांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
