प्रतिनिधी शेख अन्सार
रिसोड : रिसोड शहरातील जुनी वस्ती व रिसोड शहराला वीजपुरवठा करणाऱ्या काही महत्त्वाच्या तारा व खांब अतिशय जुने व जीर्ण अवस्थेत असून त्यांना वाऱ्याची हलकीशी झुळूकही सहन होत नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे रिसोडकरांना प्रचंड त्रास होत असून त्यांचे नियोजनही बिघडत आहे.काही खांब व तारा पन्नास वर्षांहून अधिक काळापूर्वी बसविण्यात आल्याने त्या अतिशय नाजूक झाल्या आहेत आणि खांब खालून कुजलेले आहेत जे केव्हाही कोसळू शकते.याशिवाय त्याला जोडलेल्या तारा जीर्ण झाल्या आहेत,ज्या वाऱ्यात तग धरू शकत नाहीत,त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे नित्याचे झाले आहे.वारंवार वीज खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. याकडे लक्ष देऊन नवीन खांब व तारा बसवाव्यात व वीजपुरवठ्यातील व्यत्यच्या समस्येतून सुटका व्हावी.शहराला वीजपुरवठा करणारे महत्त्वाचे खांब व तारा जुन्या झाल्या आहेत.इथे कोणताही बिघाड झालाच तर वीजपुरवठा तासनतास खंडित राहतो.रिसोड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी विद्युत तारा काही झाडांवर अडकल्याचे दिसून आले आहे.वाऱ्याचा थोडासा झोका आला की, तारा एकमेकांवर आदळून वीजपुरवठा खंडित होतो. या समस्येकडे महावितरणनेही लक्ष देण्याची गरज आहे.जिर्ण खांब व तारामुळे मोठा अपघात होण्याचा धोका कायमच असतो.
अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता
शहराची लोकसंख्या आणि ग्राहकांची संख्या लक्षात घेता महावितरणमध्ये अधिकारी व कर्मचारी वाढण्याची गरज आहे.रिसोडमध्ये उपकार्यकारी अभियंता आणि शहरात एका सहायक अभियंत्याची नितांत गरज आहे.याशिवाय तेथे रिसोड तालुक्यात आठ ते दहा लाईनमनची गरज असून सध्या दोन लाईनमन तर चार आऊटसोर्सिंगचे काम करतात.त्यामुळे ही पदे भरणे गरजेचे झाले आहे.
ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे आवश्यक आहे.
रिसोड शहर व ग्रामीण भागात अनेक वर्षापूर्वी बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता सारखीच आहे.मात्र, त्या तुलनेत ग्राहकांची संख्या दोन ते तीन पटीने वाढली आहे.ट्रान्सफॉर्मरची क्षमताही वाढविण्याची गरज आहे.
