शेख अन्सार
रिसोड : आज ३० जून रोजी शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थ्यांमध्ये शाळा उघडण्याचा उत्साह स्पष्ट दिसत होता.रिसोड तालुक्यातील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या असून मुलेही शाळेत येऊ लागली आहेत.परंतु दरम्यान, रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथे एक वेगळेच प्रकरण पहायला मिळाले.१ ते ७ पर्यंत असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक संख्या कमी आहे .येथे एकूण 227 विद्यार्थी शाळेत असून ऐकून ६ शिक्षक आहेत यातील १ शिक्षक मुख्याध्यापक आहे.गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी आणखी एका शिक्षकाची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली होती.परंतु शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेला आज ३० जून रोजी ग्रामस्थांनी कुलूप ठोकून धरणे आंदोलन केले.शाळा सुरू झाल्यापासून २ तास चाललेल्या या आंदोलनात केंद्रप्रमुख संतोष भिसडे यांनी मध्यस्थी करून शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ आणि पालकांना एक शिक्षक देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेतले.. मात्र शिक्षणाप्रती शासन व प्रशासन किती गंभीर आहे बोरखेडी गावातील या जिल्हा परिषद शाळेतील प्रकरणानंतर दिसून येते. बोरखेडी जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थी नवोदयासाठी पात्र झाले आहे.शिक्षणाचा स्तर उंचावण्याऐवजी येथे वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.10 तारखेच्या आत शिक्षक नियुक्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन पुन्हा केले जाईल, असेही ग्रामस्थांनी सूचित केले आहे. आंदोलन संपल्यानंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले.शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी चर्चा करून 10 दिवसांत शिक्षक नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. ग्रामस्थांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल.
संतोष भिसडे, केंद्रप्रमुख

