*अफसर शेख*
शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. संतोष महादेव गर्जे (वय 38) असे महसूल सहायकाचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शेवगाव तहसील कार्यालयात चॅप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी तसेच दोन मुलांना सबजेलमधून सोडण्यासाठी मदत करण्याचे सांगत गर्जे चार हजार रुपयांची लाच स्वीकारत होता. शेवगाव तहसील कार्यालयात हा सापळा रचण्यात आला होता.
*४ हजारांची मागणी*
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या दोन मुले व एक भाचा यांना सबजेलमधून सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे तसेच तहसील कार्यालयात चॅप्टर केस दाखल झाल्यानंतर त्यामध्ये मदत करण्याच्या बदल्यात प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे गर्जेने तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तडजोडी अंती ही रक्कम चार हजार रुपये ठरली होती. तक्रारदार यांनी याबाबात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक येथील पथकाने शेवगावच्या तहसील कार्यालयात सापळा रचला होता. पैसे स्वीकारताना पथकाने गर्जेला ताब्यात घेतले. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.