निळवंडे डाव्या कालव्याच्या गेटवर आंदोलन निलवंडे कालव्याच्या आंदोलनात मोठा प्रतिसाद



अहमदनगर अफसर शेख



अकोले : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यामुळे कालव्यातून गळती होवून अनेक घरांत पाणी घुसले आहे. तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हे पाणी बंद करावे, असे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते. मात्र, तरीही पाणी सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे यांनी जलाशयावरील डाव्या कालव्याच्या गेटचे कुलूप तोडून ठिय्या आंदोलन केले.



महिला, शेतकरी, कार्यकर्ते यांच्यासमवेत आलेल्या सुनीता भांगरे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो, सुनीताताई भांगरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, पाणी बंद झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे अशा घोषणा देऊन जलाशय परिसर दुमदुमला होता. तर कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांना घेराव घालत पाणी बंद करा, शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्या, अशा मागण्या करण्यात आल्या.


यानंतर अभियंता माने यांनी शांततेचे आवाहन केले. परंतु सुनीता भांगरे यांनी हातात दगड घेऊन गेटचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. पाणी बंद करता की आम्ही चाक बंद करू असे त्यांना सांगितले. त्यानंतर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांनी संपर्क करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन प्रश्न मार्गी लावण्यासाठी यंत्रणा सुरू केली. तसेच जलसंपदा विभागानेही लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित झाले.


यावेळी अगस्ती कारखान्याचे संचालक प्रदीप हासे, विकास बंगाळ, अनिल वाकचौरे, भाऊसाहेब तिटमे, रंगनाथ तिटमे, बादशहा वाळके, उमेश वाळके, शुभम वाळके, पुष्पा तिटमे, संगीता तिटमे, शांताबाई तिटमे, रोहिणी तिटमे, शारदा वाळके, कल्पना वाळके आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post