अहमदनगरअफसर शेख
जून महिन्याचा अर्धा महिना लाेटला, तरी शहरासह जिल्ह्यात पावसाची अजूनही हजेरी नाही. त्यामुळे तहानलेल्या गावांसाठी टँकरच्या संख्येत आणखी वाढ हाेत आहे. आजमितीला जिल्ह्यातील २७ गावे, १२० वाड्यावस्त्यांवर ४८ हजार १६७ लाेकांना १६ टँकरद्वारे प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे.
सध्या १६ टँकर सुरू
दुष्काळी आवर्षण क्षेत्रातील जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा उन्हाळ्यात टंचाई जाणवली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्या मर्यादित राहिली. यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. थेट १८ एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात एकेक टँकर सुरू झाला. त्यानंतर जून महिन्यात हळूहळू टँकरची संख्या वाढू लागली आहे. ती सद्यस्थितीत १६ पर्यंत गेली आहे. टँकर सुरू असलेली सर्वाधिक १२ गावे पारनेर तालुक्यातील आहे.
