अफसर शेख अहमदनगर
नेवासा: शनिशिंगणपूर येथील शनैश्वर देवस्थानच्या दिपस्तंभावर ब्राँझ व गोल्ड प्लेटींग कळस बसविण्यासाठी देवस्थाकडून ४ लाख २८ हजार रुपये घेऊनही संबंधित ठेकेदाराने काम न करता देवस्थानची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोव्याच्या बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैनेश्वर देवस्थानच्या पॅनलवरील अभियंता योगेश नानासाहेब वाबळे (वय ३५, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) यांनी शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने देवस्थानच्या दिपस्तंभावर ब्रॉझ व गोल्ड प्लेटिंगचा कळस बसविण्याचा निर्णय सन २०२० मध्ये घेतलेला होता. त्या संबंधित कामाचा ठेका गोवा येथील जगदीश भट नावाच्या ठेकेदाराच्या संस्थांकडून देण्यात आलेला होता. मात्र, या दरम्यान कोरोना संसर्ग प्रादुर्भावाचे संकट असल्याने व सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सदरचे काम रखडलेले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देवस्थानने ठेकेदाराला काम करण्यास सांगितले. त्यासाठी वेळोवेळी धनादेश व आरटीजीएसद्वारे ४ लाख २८ हजार रुपये देण्यात आले. मात्र, त्याने विविध कारणे सांगत काम करण्यास चालढकल केली. वारंवार सांगूनही कळसाचे काम अपूर्ण राहिल्याने संबंधित ठेकेदाराने देवस्थानची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
