अफसर शेख
केंद्र शासनाच्या 'एक देश, एक रेशनकार्ड' योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात सर्व रेशनकार्डाची छाननी करण्यात आली. या वेळी ८ हजार ४२ नावे दुबार आढळली. ही नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिन्याला ४०२ क्विंटल धान्य वाचणार
शासनाने रेशनकार्डला आधारकार्ड लिंक केल्यामुळे एकच व्यक्ती दोन-दोन रेशन कार्डवर लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशी दुबार नावे असलेल्या व्यक्तींचे एका ठिकाणचे नाव वगळण्यात येणार आहे. एक देश एक रेशन कार्ड योजनेमुळे देशात कोठेही गेले, तरी ती व्यक्ती रेशन घेऊ शकते. मात्र, अनेकदा त्यांच्या मूळ गावीही त्याच्या नावे धान्य उचलले जाते. याबाबत पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत प्रत्येक लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. नगर जिल्ह्यात आजमितीला सहा लाख ९९ हजार ४३६ रेशन कार्ड आहेत. त्यापैकी ८ हजार ४२ नावे दुबार असल्याचे आढळून आले आहे. ही नावे वगळल्यानंतर शासनाचे महिन्याला ४०२ क्विंटल धान्य वाचणार आहे.
