*अफसर शेख*
अहमदनगर : जिल्ह्यातील कोपरगाव येथील तरुणीचा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याजवळ मृतदेह आढळून आला आहे. तिने एमपीएससीतून राज्य वन सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली होती. दर्शना दत्तू पवार असं मृत तरुणीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले होते.मात्र त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना पवार असं या तरुणीचं नाव असून राहुल हांडोरे असं तिच्यासोबत ट्रेकिंगला गेलेल्या मित्राचं नाव आहे. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्रावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे.पोलिसांनी दर्शनाचे वडील दत्तात्रय पवार यांना माहिती देत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं आहे. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता आणि काही भाग प्राण्यांनी खाल्लेला देखील होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.
