प्रतिनिधी --- अर्जुन शेळके
शिरूर
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोचा जनसमुदाय उपस्थित होता. मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता निघोज ग्रामस्थ व लाखो भावीक मळगंगा देवीचे दर्शन घेऊन व पालखी घेऊन सकाळी साडेसात वाजता देवीच्या हेमाडपंथी बारवेकडे पालखी घेऊन गेले. त्याठिकाणी मानकरी तसेच देवीचे पुजारी संतोष गायखे यांच्या हस्ते देवीच्या श्रींची घागरीची विधीवत पूजा केली. त्यानंतर मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या लाखो भावीकानी मळगंगा
देवीच्या जयजयकाराच्या घोषना देत आसमंत दणाणून टाकला. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची घागर मिरवणूक हा एक अद्वितीय सोहळा पाहण्यासाठी व घागर माध्यमातून देवीचे प्रत्यक्ष दर्शन होत असल्याचा भावीकांची श्रद्धा आहे गेली शेकडो वर्षांपासून ही श्रद्धा परंपरा जतन करण्याचे भावीक मोठ्या उत्साहात करीत आहेत. सकाळी आठ वाजता देवीच्या श्रीं ची घागर मिरवणूक बारवे पासून सुरू झाली वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत महिला भगीणींचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शेकडो महिला पितळी तसेच ईतर धातूच्या कळशा घेऊन या घागर मिरवणूकीच्या मागे देवीचे भक्तीमय गाणे म्हणत तसेच देवीचा जयजयकार करीत मोठया श्रद्धेने सहभागी झाल्या होत्या. यावेळी ही मिरवणूक जुनी पेठेच्या मागील पेठेतून मळगंगा मंदीरा पर्यंत आल्यानंतर देवीच्या मंदीराबाहेर देवीच्या पुजारी संध्या गायखे, सुवर्णा गायखे , सारिका गायखे, रुपालीताई गायखे यांच्या हस्ते घागरीचे औषन करण्यात आले या ठिकाणी पुजारी सुनिल गायखे, ठकाराम गायखे, संतोष गायखे, दादु
गायखे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी लाखो भावीकांनी देवीचा जयजयकार करीत टाळ्यांचा कडकडाट करीत माता मळगंगा देवीचा साक्षात्काररुपी घागरीचे जोरदार स्वागत केले. यावेळी गावकऱ्यांनी मळगंगा मंदीर तसेच घागर यावर ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी केली. या पुष्पवृष्टी चे चित्रीकरण करण्यासाठी युवकांनी भ्रमणध्वनीवर टिपण्यासाठी स्पर्धा लागली होती. पुष्पवृष्टीचे दृश्य अतिशय मनमोहक व लक्षवेधी होते अशाप्रकारे प्रथमच घागर, मंदीर व मिरवणूक यावर पुष्पवृष्टी झाल्याने भावीकांमध्ये उस्तुकता निर्माण झाली होती. त्यानंतर हीच मिरवणूक मुख्य पेठेतून ग्रामपंचायत चौक मार्गे पुन्हा देवीच्या बारवेजवळ आली. ही मिरवणूक सुरू असताना मुख्य पेठेतील प्रत्येक घरावर देवी दर्शनासाठी हजारो भावीक उभे होते. मुख्य पेठेतील गर्दी लक्षात घेता हेच हजारो भावीक घराच्या माळजावर तसेच गॅलरीत सकाळी सातपासून घागर दर्शनाची प्रतिक्षा करीत असतात.हेच भावीक श्रद्धेने देवी घागरीचे दर्शन घेत फुलांचा व रेवड्यांचा मिरवणूकीवर वर्षाव करीत देवीचा जयजयकार करीत श्रद्धा व्यक्त करतात. यावेळी हीच रेवडी भावीक गोळा करीत हा देवीचा प्रसाद समजून मोठ्या भक्तिभावाने ग्रहन करतात. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही श्रींची घागर मिरवणूकीची सांगता पुन्हा देवीच्या हेमाडपंथी बारवेत करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी संतोष गायखे यांनी बारवेत विधीवत पूजा करुण पाण्यात विसर्जन करण्यात आले. तब्बल दिड तासांच्या या मिरवणुकीत लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. त्यानंतर नगर व पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील आलेल्या भावीकांनी देवीला दंडवत घालून मिरवणूकीने शेरणीच्या प्रसादाचे वाटप केले. हजारो क्विंटल गुळ यासाठी उपयोगात आणला गेला आहे. त्यानंतर आलेल्या लाखो भावीकांनी गाव व परिसरात ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी सवाष्णी कार्यक्रम करीत माता मळगंगा देवीला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर दुपारी चार वाजता देवीच्या ८५ फूट उंचीची काठी तसेच पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड या ठिकाणी असलेल्या मळगंगा मंदीराच्या शिखराला लागल्यानंतर या ठिकाणी कुंडाची यात्रा सुरू झाली. ही यात्रा शेतीचे औजारे व साहित्य तसेच खेळणी व मिठाई साठी अतिशय प्रसिद्ध आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसात लाखोंची उलाढाल या ठिकाणी होत असते. बुधवार दि.२३ रोजी दुपारी चार वाजता नामवंत पैलवानांचा कुस्त्यांचा हगामा याठिकाणी होत असून निघोज ग्रामस्थांच्या वतीने लाखो रुपयांची बक्षिसे नामंकीत पैलवानांना देण्यात येणार आहे. या कुस्ती हगाम्याने कुंड यात्रेची सांगता होत असते. सोमवार दि. २१ रोजी सुरू झालेली यात्रा बुधवार दि.२३ पर्यंत मोठ्या उत्साहात सुरु असते किमान तीन दिवसांत एक ते ते दोन लाख भावीक दर्शनासाठी येत असतात यावर्षी सुद्धा मोठी गर्दी झाल्याने दोन लाखांपेक्षा जास्त भावीक आले होते. सर्वाधीक संरक्षणाची जबाबदारी पोलीस खात्याची असल्याने सोमवार दि.२१ पासून पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निघोज येथील सर्व पोलीस स्टाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच होमगार्ड यांनी यावेळी अनेक चोरट्यांना पकडून चोऱ्या होऊ नये यासाठी प्रामुख्याने दक्षता घेतल्याने ग्रामस्थांनी व भावीकांनी पोलीसांचे कौतुक केले. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर यांनी पाणी सोडण्याच्या सुचना त्वरेने दिल्याने पाटबंधारे विभागाचे कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच निघोज शाखाधिकारी पाटील यांनी निघोज येथील कपिलेश्वर बंधाऱ्याला वेळेवर पाणी सोडून लाखो भावीकांची पाण्याची व्यवस्था करुन कौतुकास्पद काम केले आहे. विज वितरण कंपनीचे पारनेर येथील अभियंता हातोळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवार दि २१ ते मंगळवार दि.२२ रोजी २४ तास विद्युत पुरवठा खंडित न होता केल्याबद्दल भावीक व ग्रामस्थ यांनी विज मंडळाचे कौतुक केले आहे. आरोग्य विभागाने २४ तास आरोग्य सेवा देउन भावीकांची सेवा केली आहे. तसेच निघोज ग्रामपंचायतने २४ तास नळपाणी पुरवठा सक्षमपणे सुरु ठेऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले आहेत. एस टी बस सेवा सदोदित सुरु राहून आळेफाटा, पारनेर , शिरुर येथून तसेच निघोज ते कुंड स्पेशल यात्रा बसेस सोडून मोठ्या प्रमाणात भावीकांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल यात्रेकरू व भावीक तसेच ग्रामस्थ यांनी पारनेरचे एस टी आगार व्यवस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत. मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी देवीचे दर्शन भावीकांना व्यवस्थीत घेता यावे यासाठी मळगंगा देवीच्या मंदिरात दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था केली होती दोन दिवसात या दर्शन रांगेच्या माध्यमातून लाखो भावीकांना मनोभावे दर्शन घेता आले याबद्दल भावीकांनी समाधान व्यक्त केले आहे. चौकट.
गेली शेकडो वर्षापासून या यात्रेचे नियोजन पुर्वजांनी अगदी यथायोग्य केले आहे. सर्व जातीजमातींना या यात्रेची जबाबदारी दिली असून ही यात्रा सर्वसमावेशक कशी होईल यासाठी प्रयत्न केले आहेत. आजही तीच परंपरा व रुढी सुरू असून
चोपदार - शिंपी समाजाला मनोहर दिवसे, अब्दागीरीचा मान कोष्टी समाजाला - श्रीकांत शेवाळे, चवरीचा मान ब्राम्हण समाज, सचिन धोंगडे यांना तसेच ईतर समाजाला सुद्धा महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. धोलवड, उंब्रज, चिंचोली, भिंगार बेलापूर, नेवासा येथील मळगंगा देवीचे स्थान असलेल्या गावातील मानकऱ्यांना देवी पुजा, घागर पुजा मान देऊन सन्मान करणयाचे काम होत आहे.
चौकट.
परिक्षा आणी कडक उन्हाळा याचा परिणाम यात्रेवर मोठ्या प्रमाणात झाला असून यावर्षी गर्दी नाही म्हणून व्यवसायीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आठ दिवसाची यात्रा असली तरी काठी, छबिणा, पालखी, घागर मिरवणुकीला गर्दी नेहमीपेक्षा पंचवीस टक्केच होती. व्यापारी, व्यवसायीक यांनी लाखो रुपये भांडवल गुंतवणूक केली मात्र माला लाखाचा विक्री दहा हजाराची एवढा मोठा फरक पडल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट.
खासदार आमदार यांची उपस्थिती
खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते सर, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सरपंच दत्ता नाना पवार, सरपंच पंकज कारखिले, देवीभोयरे सरपंच अशोकराव मुळे, वडनेर सरपंच राहुल सुकाळे, शिरापूर सरपंच भास्कर उचाळे तसेच ईतर मान्यवर आदिंनी देवीचे दर्शन घेऊन मळगंगा ट्रस्ट, गावकरी समीती या ठिकाणी भेट दिली व गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट विश्वस्त अनिल लंके व माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी केले.
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा महिमा अगाध आहे. या यात्रेसाठी लाखो भावीकांची मांदियाळी असते. घागर मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करुण भावीक आनंद घेतात यावर्षी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट पदाधिकारी व विश्वस्त यांनी घागर मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती याचे भावीकांनी स्वागत केले.
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या श्रींची घागरीची मिरवणूक मोठ्या उत्साहात तसेच भक्तीभावाने संपन्न झाली यावेळी लाखो भावीकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
