उसतोड मजुरांची बंधकामधून सुटका – शिरूर पोलिसांची धडक कारवाई



प्रतिनिधी अर्जुन शेळके| शिरूर, पुणे |

शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ बंधनकारकरीत्या उसतोड मजुरीस लावण्यात आलेल्या मजुरांची अखेर शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 14 मजुरांना मुक्त केले असून, संदिप बाळु डुबे (रा. गणेश नगर, आलेगाव पागा) याच्याविरोधात गु.र. नं. 551/2025 नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बांधणी मजुरीसाठी फसवून आणले

फिर्यादी ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण (वय 31, रा. मूळगाव ब्रम्हगाव, ता. पैठण, सध्या रा. आलेगाव पागा) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संदिप डुबे याने 2023 साली त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उसतोड कामासाठी बोलावून घेतले. त्यावेळी प्रत्येकी 20 हजार रुपयांची उचल रक्कम देण्यात आली होती. परंतु, नंतर या मजुरांकडून जबरदस्तीने काम करून घेतले गेले व त्यांचा मोबदला दिला गेला नाही.


आजारी व्यक्तीला उपचार नाकारले

फिर्यादीच्या आईला आजारपणात उपचारासाठी सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर, डुबे याने त्यांचा पाठलागकरून त्यांना जबरदस्तीने परत आणले. त्यांच्या गावी जाण्यावरही बंदी घातली जात होती.


धमकी व मारहाण

कामाच्या मोबदल्याची विचारणा केल्यास धमकी देण्यात येत होती. तसेच श्रीधर दत्ता लोंढे या नातेवाईकास उस तोडायला न गेल्याच्या कारणावरून मारहाणही करण्यात आली होती.


प्रशासनाची संयुक्त कारवाई

या प्रकाराची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, नायब तहसीलदार स्नेहा गोसावी, कामगार अधिकारी, NGO प्रतिनिधी, आणि ग्रामस्थांच्या मदतीने या मजुरांची सुटका केली. या कारवाईत लहान मुले, महिला, वृद्ध, गाई, बकरी, कोंबड्यांसह सर्व कुटुंबीयांची सुरक्षितपणे मुक्तता करण्यात आली.


गुन्हा दाखल – तपास सुरुया प्रकरणी संदिप डुबे याच्याविरोधात भा.दं.सं. 115(2), 126(2), 131, 351(2)(3) तसेच बंध बिगार पद्धती अधिनियम 1976 चे कलम 9, 16, 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेळके  हे करत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post