चौफुला महामार्गावर काळाने गाठलं… दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, गावांवर शोककळा

 चौफुला महामार्गावर काळाने गाठलं… दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, गावांवर शोककळा



प्रतिनिधी – अर्जुन शेळके 


सकाळी रोजच्याप्रमाणे कामासाठी निघालेल्या दोन होतकरू तरुणांना नियतीने गाठले आणि त्यांच्या घरांवर काळाचे ढग दाटून आले. चौफुला – शिरूर महामार्गावरील आंधळगावजवळ आज सकाळी ७ वाजता झालेल्या भीषण अपघातात विक्रम सकट (वय ३०, आंधळगाव) आणि संदीप मदने (वय ३२, नागरगाव) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


दोघेही एमआयडीसी करडे येथे नोकरीसाठी दुचाकीने निघाले असताना, भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांना सुमारे १०० फूट फरफटत नेले गेले. धडक एवढी भीषण होती की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.


ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरगाव आणि आंधळगाव या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. संदीप आणि विक्रम हे दोघेही आपल्या कुटुंबाचे आधार होते. त्यांच्यामागे वृद्ध वडील, पत्नी, लहान मुले आणि आई असा परिवार उरला आहे, ज्यांचे आयुष्य एका क्षणात बदलून गेले.

 विशेष म्हणजे, संदीप मदने हा नागरगावमधील गेल्या काही वर्षांत अपघातात मृत्यू पावलेला सहावा तरुण ठरला आहे.

चौफुला – शिरूर महामार्गाचा विस्तार झाला असला तरी या मार्गावर अपघात टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. स्पीड ब्रेकर नाहीत, सीसीटीव्ही नाहीत, ना ट्रॅफिक पोलिस. त्यामुळे या मार्गाला "मृत्यूचा सापळा" असेच संबोधले जाऊ लागले आहे.


गावकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोशल मीडियावर स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक नियंत्रण आणि सीसीटीव्ही लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




विकासाच्या नावाखाली रस्ते होतात, पण माणसं हरवतात… ही कोणत्या प्रगतीची किंमत?” — असा सवाल आता गावकऱ्यांच्या मनात घर करू लागला आहे.


आज दोन घरांतील चूल विझली, दोन महिलांच्या हातात पंखा आला, दोन आयांच्या काळजाचे तुकडे हरवले…


हे मृत्यू केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक बळी ही एक हळवी कथा आहे… आता तरी प्रशासन जागं होईल का?

Post a Comment

Previous Post Next Post