शबरी महामंडळाच्या उपक्रमातून स्वावलंबनाची नवी संधी,
१० आदिवासी कुटुंबांना कुक्कुटपालनासाठी पिंजरे व ३०० कोंबडी पिलांचे वाटप.
पालघर जिल्हा प्रतिनिधी - सतेंद्र मातेरा.
पालघर जिल्ह्यातील नानिवली (ता. पालघर) येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत Household Level Poultry Units and Marketing Linkages प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी कुटुंबांना गावातच पूरक उद्योग उपलब्ध करून देत स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे.
या योजनेअंतर्गत १० आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी १ पिंजरा व ३० अंडी देणारी कोंबडी पिले देण्यात आली. अशा प्रकारे एकूण १० पिंजरे व ३०० कोंबडी पिलांचे वाटप करण्यात आले. यामागचा उद्देश आदिवासी कुटुंबांना स्वावलंबी करणे, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे आणि रोजगारनिर्मिती करणे हा आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पिंजरे व कोंबडी पिले वाटप करण्यात आले. यावेळी शबरी महामंडळाचे व्यवस्थापक (कोकण विभाग) राजेश पवार, प्रादेशिक व्यवस्थापक (जव्हार) योगेश पाटील, सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश सवरा, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना प्रकल्पाची अंमलबजावणी, कुक्कुटपालन व्यवसायातील संधी, बाजारपेठेतील मागणी व तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांना गावातच अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होणार असून महिलांनाही रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच प्रशिक्षित कामगारांची निर्मिती होईल.
शबरी महामंडळाच्या या उपक्रमामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची मजबुती, आदिवासी भागातील उत्पादनवाढ आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यास मोठा हातभार लागेल, असे मान्यवरांनी सांगितले.

