अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची धडक कारवाई ३२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक

 अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी पालघर पोलिसांची धडक कारवाई

३२.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त ; दोघांना अटक



पालघर जिल्हा प्रतिनिधी - सतेंद्र मातेरा.


पालघर जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व तलासरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करून तब्बल ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार, ३ सप्टेंबर२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, लाल रंगाचा आयसर टेम्पो (एम एच १० डी टी ६६३३) मधून गुटखा वाहतूक होणार आहे.


त्यानंतर तलासरीतील ईभाडपाडा ओव्हरब्रिजजवळ नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांना संशयित टेम्पो दिसताच त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखू व गुटखा मिळून आला. जप्त मालाची किंमत तब्बल २०.९६ लाख रुपये एवढी असून, टेम्पोसह एकूण जप्ती ३२.९६ लाख रुपये इतकी झाली आहे.


या प्रकरणी टेम्पो चालक बाळु किसन गंगावणे (वय ५०, रा. सांगली) व त्याचा साथीदार राजु संजय कांबळे (वय २७, रा. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कारवाईत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व डहाणू उपविभागीय अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि प्रदीप पाटील, तलासरी पोलीस ठाण्याचे पोनि अजय गोरड तसेच पथकातील इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. पुढील तपास पोउपनि अमोल चिंधे (तलासरी पोलीस ठाणे) करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post